On 6th July 2019 I delivered speech at convocation of my school, Shiv Samarth Vidyalaya, Thane, India. Here is the text of speech in Marathi.
विद्यार्थि मित्रांनो,
जय हिंद!
आज मी आपल्याशी काही हितगुज करणार आहे, किंबहुना माझे स्वतःचे काहीस स्वगत, काहीस मनोगत व्यक्त करणार आहे. मनात अशी आशा आहे कि कदाचित मी तुमच्या मनातील काही गोंधळाला माझ्या दृष्टीने योग्य दिशा दाखवू शकेन किंवा कदाचित तुमच्या अंतरंगात काही विचार प्रज्ज्वलित करू शकेन.
मित्रांनो हे तुमचं वर्ष दहावीचं. आतापर्यंत अनेकदा आवर्तनं झाली असतील की हे वर्ष फार फार महत्वाचं आहे ह्याची. मित्रांनो हे वर्ष हे एक फक्त वळण आहे तुमच्या जीवनातले. अशी खूप खूप वळणे येणार आहेत भविष्यात. तेंव्हा मी असे म्हणणार नाही की फक्त आणि फक्त दहावीचं तुमच्या आयुष्याची दिशा ठरविते.
मित्रांनो आपल्याला जन्म मिळाला आहे मनुष्याचा. का मिळाला आहे हा जन्म? काय आहे आपले उद्दिष्ट ह्या धरतीतलावर? खरंच असे प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडले असतीलच.
शिक्षण घेणं, विद्येत पारंगत होणं, योग्य नोकरी शोधणं, योग्य वेळी संसार करणं, हे सगळे कस बरोबर आणि प्रशस्तच वाटते. परंतु जर आपण थोडा अधिक विचार केला तर हा साधा सरळधोपट मार्ग, ज्यावरून बहुसंख्य मार्गक्रमण करू इच्छितात हा मार्ग दुसऱ्या कोणीतरी आपल्या करता प्रशस्त केला असतो.
निसर्गनियमाने नेमून दिलेलं सरळधोपट आयुष्य तर किडामुंगी पण जगतात. तर मग मनुष्यात व किडामुंगीतं काय फरक आहे? हाच खरा प्रश्न आहे. आपण मनुष्य उद्याचा किंबहुना लांबचा विचार करू शकतो, तसेच आपण दुसऱ्यांचा विचार करू शकतो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आपण आपल्यास काय हवे, काय नको त्याचा विचार, आपल्या महत्वाकांक्षेचा विचार करू शकतो. हाच फरक आहे मनुष्यात आणि प्राण्यांत!
तेंव्हा दूरदृष्टीने लांबचा विचार करा. नेहमी दुसऱ्याचा विचार करा आणि त्याचबरोबर स्वतःची महत्वाकांक्षा विसरू नका.
हा विचार जरा मला विस्तारानं मांडु द्या.
मी माझ्या विचारांची मांडणी सुरु केली जय हिंद ह्या घोषवाक्याने. जय हाहि एक शब्द आहे आणि विजय हाहि एक शब्द आहे. आपण ह्या दोन शब्दांना समानार्थी मानतो. परंतु हे पूर्णपणे समानार्थी शब्द नव्हेत. जय शब्दाचा भाव असे दर्शवितो की मी जिंकलो परंतु कोणीही दुसरे हरले नाही. जय शब्दात द्वंद्व नाही तर समनव्यय आहे. विजय शब्द एकाची वरचढ आणि इतरांची घसरण सूचित करतो. विजय शब्दात द्वंद्व आहे, समनव्यय नाही. जेव्हां आपण जय हिंद म्हणतो, तेंव्हा आपण आपल्या मातृभूमीचा गौरव इच्छितो, इतर देशांची हार इच्छित नाही आपण.
त्याचप्रमाणे, आपण आपल्या महत्वाकांक्षेला जयाच्या कक्षेत गुंफायचं; विजयाच्या गोत्यात गुंतवायच नाही. एकदा का तुम्ही जय आणि विजयामधील फरक आपल्या विसरसरणीत घट्ट विणलात की स्वतःच्या महत्वाकांक्षेत इतरांच्या आशा आणि अपेक्षा सामावणे अगदी सहजसोपं होऊन जाते.
आता प्रश्न पाहूया की आपण दुसऱ्याचा विचार करणे आवश्यकच आहे का? अनेक जण म्हणतांत की मी बरा, माझं काम बर. तसेच अनेक विचार करतात की मला यशस्वी व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय; मला दुसऱ्याचं काय देणं घेणं? मी काय समाजसेवक आहे का इतरांची चिंता करायला?
हा विचार चुकीचा आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर तुम्हाला इतरांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. अगदी साधं उदाहरण देतो. कुठल्या वडापाववाल्याची गाडी जास्त चालते? जो आपली गाडी अश्या ठिकाणी लावतो की जास्तीत जास्त लोकांना वडापाव घेणं सोपं जात त्याच्या गाडीवरून आणि जो सगळ्यात रास्त किमंत घेतो व योग्य गुणवत्ता देतो. अगदी साधं उदाहरण आहे हे. जर तुमचा वडापाव जास्तीत जास्त लोकांची भूक जास्तीत जास्त काळ भागवतो, तर तुंम्ही यशस्वी व श्रीमंत; नाही तर नाही. म्हणजे, प्रत्येकाला दुसराच्या विचार करणे आणि दुसऱ्याच्या दीर्घ दृष्टीने हित बघणे आवश्यक आहे. जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला तुमच्या कार्यालयाचे आणि पर्यायाने तुमच्या कार्यालयाच्या ग्राहकांचे दीर्घ हित बघणे आवश्यक आहे. जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला तुमच्या शिक्षकांना तुमची उत्तर पत्रिका कशी नेहमीच आवडेल ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. जर तुम्ही व्यावसायिक आहात तर तुम्हाला तुमच्या ग्राहकांचे आणि प्रामुख्याने तुमच्या कर्मचाऱ्यांचे दीर्घ हित बघणे आवश्यक आहे.
फक्त चोर व दरोडेखोरच असे लोक आहेत की त्यांना दुसऱ्यांचे दीर्घ हित बघणे आवश्यक नाही. कारण ते विजय इच्छितात जय नाही.
आता योग्य वेळ आली आहे की आपल्या घोषवाक्यातील दुसऱ्या शब्दाची महिती जाणून घेण्याची.
हिंद. भारत. भारतवर्ष.
आपला भारतवर्ष फारच विशेष देश आहे. आपली लोकसंख्या आता जवळपास १४० कोटी पोहचते आहे. आणि तुमची पिढी ही फार विशेष पिढी आहे. मी अस समजतो तो की तुमचा जन्म २००४ च्या जवळपास झाला आहे. त्या वर्षी भारतात अडीज कोटींपेक्षा जास्त बालक जन्मली. हा एक फार मोठा आकडा आहे. आता २०१९ मध्ये तो आकडा रोडावून दोन कोटींपर्यंत खाली आला असावा असा माझा अंदाज आहे.
म्हणजे आपल्याला १४० कोटी इतर लोकांचा विचार करायची संधी आहे. बघा मी मघाशी सांगितल्याप्रमाणे जितक्या जास्त लोकांचे प्रश्न तुंम्ही सोडवू शकतात तेवढे तुम्ही जास्त यशस्वी होणार.
अजून विचार केलात तर जाणवेल की आपल्या देशाचे प्रश्न हीच आपली संधी आहे. इथे एवढे प्रश्न आहेत की ते सोडवता सोडवता तुमच्या सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होतील. फक्त तुम्ही ठरवायचं कि मी कुठला प्रश्न हा माझ्या महत्वाकांक्षेचं इंधन म्हणून वापरणार आणि तो सोडवून यशस्वी होणार.
मी इथं तुम्हाला हे सांगत नाही की पैसे म्हणजे यश, की कीर्ती म्हणजे यश कि समाजसेवा म्हणजे यश. ते तुमच्या महत्वाकांक्षेवर अवलंबून आहे.
मी फक्त हे सांगतो आहे की फार मोठी महत्वाकांक्षा ठेवा, त्यात दुसऱ्यांच्या इच्छांना जागा द्या आणि दूरदुर्ष्टी ठेवा, आणि देशाच्या प्रश्नांना आपल्या आयुष्याला दिशा देण्याची एक संधी समजा. प्रत्येक प्रश्न तुम्हाला यशाच्या वाटेवर नेऊ शकतो.
आता, शेवटचे दोन शब्द. अनुभवाचे शब्द.
मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात कुठलाही अडथळा माझ्या महत्वाकांक्षेच्या आड येऊ दिले नाहीत. तुमची जिद्द हेच तुमचे भांडवल असते. आज जरी तुम्ही कफ्फलक असाल तरी त्याचा तुमच्या उद्यावर काही विपरीत परिणाम होत नाही. कारण तुमची जिद्द हेच तुमचे भांडवल असते. आज जरी तुम्हाला जग अपंग समजत असेल तरी त्याचा तुमच्या क्षमतेवर काही विपरीत परिणाम होत नाही. कारण तुमची जिद्द हेच तुमचे भांडवल असते. आज जरी तुम्हाला कोणीही ओळखत नसेल तरी त्याकारणाने कुठलेही दरवाजे बंद होत नाहीत. कारण तुमची जिद्द हेच तुमचे भांडवल असते.
आणि सगळ्यात शेवटी. दर सकाळी एक विचार करा की आजचा दिवस हा माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिलाच दिवस आहे. परत सांगतो. दर सकाळी एक विचार करा की आजचा दिवस हा माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे कालपर्यंतच्या चुकीच्या सवयी, चुकीची संगत ह्या माझ्या संपलेल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसाबरोबर – जो काल होता त्याबरोबर – संपल्या. आज माझं नवीन आयुष्य सुरु, नवीन व योग्य सवयी आणखी योग्य विचार. दरोरोज हा विचार करा आणि पहा कसा तुमचा प्रत्येक नवीन दिवस हा गेलेल्या दिवसापेक्षा चांगला होत जातो.
जय हिंद